Tuesday, 22 November 2016

षंढ

विषण्ण करतात संध्येला
षंढ जमतात जेव्हा सर्व
जमवून घेतात आपले पेले
चालवतात आपापले तर्क

पळसाला का पाने तीन
विवाहपूर्व लैंगिक संबंध हीन
स्पर्शतात ते सर्व विषयांना
भेदत नाही कधीच कोण

उसळतात पण विरतात त्यांचे
धुमसत नाहीच कधीच निखारे
तरूण वयातच जोश संपलेले
वाटतात सारे जख्खड म्हातारे

ग्रहण लागलेले सूर्य तुम्ही
फेकून द्या सर्व आचार
जगण्यासाठी मरून पहा एकदा
मगच करा जगाचा विचार...

Thursday, 10 November 2016

सजणी



तुझ्या डोळ्यातल्या कवितांचे
सांग समजावून अर्थ
तुझे नटणे अबोल
बाई माझ्यासाठी व्यर्थ

माझ्या ह्रदयाचा होतो
मी एकलाच स्वामी
मनअंगणात फिरतेस
सैरभैर तू घुमी

किती लपवशील शब्द
तुझ्या श्वासात लयदार
क्षणोक्षणी का दचकते
तुझ्या पावलातली खार

असते आभाळ अनंत
नको लावू तुझे डोळे
सोड वाय्रावर माझ्या
मनस्वी तुझे केस काळे

मग ये उधळत
श्रुंगारून पहाट
वाट किती पाहू
थकलाय नदीचा घाट

Monday, 7 November 2016

वेडा

माझ्याच मनातले आकार घडवून 
मीच रचतो त्यांची पूजा
वेडा म्हणो कुणि  मला
मी तर आहे जगाचा राजा

Sunday, 6 November 2016

खोली




बंद दार, बंद खिडकी
स्टूल आहे मोडका
धूळ आहे, राख आहे 
आणि भयाण शांतता

स्वप्न नाही भास नाही
नाही कुणी खरेखुरे
मीच माझ्यांत नसतांना
काय या खोलीत उरे

का रंगवू मी स्वत:ला
काय करू मी नखरा
उभा गर्दीत जरी
आरपार नजरा

खूप सांडले सत्व
आणि रंग वेगळे
वेग नाही, मार्ग नाही
दिशा कोणती नकळे

आजकाल चालतांना 
नाही कोणी सोबती
काही गेले खूप पुढे
उरली सर्व विसंगती