शुभ्र ठिपके वेगाने रेखीत
जेव्हा सकाळी ओलसर केस बांधून
तू झरझर काढतेस रांगोळी..
गालावरून ओघळणारा एखादा चुकार थेंब
चमकतो अचानक सूर्यप्रकाशात,
भिरभिरत उतरतात अंगणात
अनेक सुरेल पक्षी
धीटपणे मिसळून टाकतात आपलं गाणं..
आणि वारा खेळतो तुझ्या बटांशी,
बिलगतो कधी तुझ्या पदराला
शहारत थिरकते चोरून लाजते अंग..
दूर कुठेतरी तिकडे मागे,
एक पिकलं पान उतरतं अलगद गिरक्या घेत जमिनीवर
सोडून मागे आपली फांदीवरची जागा,
मिसळून जाण्यासाठी मातीत..
पण तू तर स्त्रवत असतेस जीवनरस नुतन इवल्या अंकुरांवर,
तेव्हा तुझ्या डोळ्यात दिसणारे तृप्त स्निग्ध भाव
टिपत असतो मी अनिमिष नेत्रांनी...
आणि तुझा अस्मानी गंध
हरवून टाकतो मला..
डॉ गिरीश भिरूड
22/11/22